अज्ञात वाहनाच्या धडकेने २ कामगारांचा मृत्यू

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : पुणे महामार्गावरील लिबे जळगाव येथे कामावरून परतणाऱ्या कामगारांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी रात्री ८:३० वाजता घडला. हे कामगार गंगापूर तालुक्यातील येसगाव येथील आहेत.
पंढरीनाथ सीताराम दिवटे आणि संजय दामोदर तांबे अशी मृताची नावे आहेत तर जखमींमध्ये नवनाथ मोहन दिवटे याचा समावेश आहे. हे तिन्ही कामगार आपले काम संपवून अहिल्यानगरकडून दुचाकी (एमएच २० डीएक्स ६८०६) वर बसून येसगाव येथे निघाले होते. दरम्यान लिंबेजळगाव येथील हॉटेल सागरसमोर आले असता
पाठीमागून भरधाव आलेल्या वाहनाने त्यांना जोराची धडक दिली.
यावेळी तिघेही दुचाकीसोबत रस्त्यावर कोसळले. यात पंढरीनाथ दिवटे आणि संजय तांबे यांचा जागीच मृत्यू झाला तर नवनाथ दिवटे गंभीर जखमी झाला. अपघातानंतर धडक दिलेले वाहन घटनास्थळी न थांबता निघून गेले. आजुबाजूच्या नागरिकांनी रुग्णवाहिकाद्वारे अपघातग्रस्तांना दवाखान्यात दाखल केले. घटनेची नोंद वाळूज पोलिसांनी घेतली आहे.